धर्मावरम सिल्क साडी (Dharmavaram Sarees) चे उत्पादन हे भारतातील धर्मावरम शहरात केले जाते, जे आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपुर जिल्ह्यामध्ये आहे. या साड्या त्यांच्या विणकामाच्या विशिष्ट पद्धतीसाठी, विविध रंग आणि साडीवरील उत्कृष्ट विणकामासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.
धर्मावरम साड्या सामान्यतः शुद्ध रेशीम पासून बनवल्या जातात, या साड्यांचे विशेष आकर्षण म्हणजे या साड्या त्यांचे मोठे काठ आणि आकर्षक रंगांसाठी ओळखल्या जातात. साडीची बॉर्डर ही स्वतंत्रपणे विणली जाते आणि नंतर मुख्य फॅब्रिकला ही बॉर्डर जोडली जाते. साडीच्या विणकामामध्ये भौमितिक आकार, धार्मिक चिन्हे आणि नैसर्गिक चित्रे तयार केले जातात.
या साड्या केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही लोकप्रिय आहेत. लग्न, सण आणि इतर विशेष प्रसंगी महिला या साड्यांना पसंती देतात.
धर्मावरम साडीचा इतिहास
धर्मावरम सिल्क साड्यांचा इतिहास 19 व्या शतकात सापडतो जेव्हा या प्रदेशातील विणकरांनी स्थानिक बाजारपेठेसाठी रेशमी साड्यांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली.
विजयनगर साम्राज्याच्या कारकिर्दीत धर्मावरम हे शहर रेशीम कापडाच्या उत्पादनाचे प्रमुख केंद्र होते. या प्रदेशातील विणकर शुद्ध तुतीचे रेशमी धागे वापरून रेशमी कापड विणण्यात अतिशय कुशल होते. 20 व्या शतकापासून धर्मावरम सिल्क साडीला प्रदेशाबाहेरील लोकांमध्ये देखील लोकप्रियता मिळाली.
20 व्या शतकाच्या सुरुवातीस, ब्रिटीश सरकारने भारतात पॉवरलूम्स आणले, ज्याचा परिणाम हातमाग उद्योगावर झाला आणि उत्पादनामध्ये मोठी घट झाली. पण तरीही धर्मावरममधील विणकरांनी पारंपरिक पद्धतीचा वापर करून रेशमी साड्यांचे उत्पादन सुरूच ठेवले. आंध्र प्रदेश राज्य हातमाग विणकर सहकारी संस्था (APCO) च्या मदतीने धर्मावरममधील विणकर साड्यांचे भारतातील इतर भागांत आणि परदेशात या साड्यांची विक्री करू शकले.
साड्यांवरील डिझाईन्स निसर्ग, पौराणिक कथा आणि स्थानिक लोककथांनी प्रेरित आहेत.
साड्यांमध्ये लाल, हिरवा, पिवळा आणि गुलाबी हे सर्वात सर्वसामान्य रंग वापरले जातात. साड्या त्यांच्या जड बॉर्डर आणि पल्लूसाठी ओळखल्या जातात. धर्मावरम रेशमी साडी आंध्र प्रदेशच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे आणि त्या प्रदेशातील समृद्ध विणकाम परंपरेचे प्रतीक आहे.
धर्मावरम साड्यांना भौगोलिक स्थानदर्शकता (GI tag ) प्राप्त आहे. 1500 हून अधिक रेशीम उत्पादन सुविधा आणि एक लाखाहून अधिक यंत्रमाग सध्या धर्मावरम मध्ये कार्यरत आहेत. अंदाजे 500 कोटी वार्षिक महसुलासह, या क्षेत्राने ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
धर्मावरम साडी ची वैशिष्ट्ये
- या साड्या प्युअर रेशीम, सोन्याच्या आणि चांदीच्या जरीपासून तयार केल्या जातात, त्यामुळे या साड्या अतिशय महाग असतात.
- या साड्यांमध्ये वापरले जाणारे रेशीम उच्च दर्जाचे असून ते देशाच्या विविध भागांतून आणले जाते.
- धर्मावरम साड्या त्यांच्या गोल्डन काठांसाठी प्रसिद्ध आहे. साड्यांच्या काठावर सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचे विणकाम केलेले असते जे या साडीला अतिशय सुंदर बनवते.
- हिंदूपूर, अनंतपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध लेपाक्षी मंदिराच्या भिंतीवरील नक्षीकाम सुंदरपद्धतीने साडीच्या काठावर आणि पदरावर तयार केलेले असतात. यामध्ये कमळ, मोर, हत्ती या नक्षीकामाचा समावेश आहे.
- या साडीची बॉर्डर 3-5 इंच इतकी रुंद असते.
- धर्मावरम साड्या विवाहासाठी अतिशय उत्तम आहेत, त्यामुळे या साड्यांना राजवाडी साड्या देखील म्हणतात.
- प्युअर धर्मावरम सिल्क साडीचे विणकाम हे दोन रांगांमध्ये केले जाते. त्यामुळे या साडीमध्ये दोन शेड्स तयार होतात.
- या साडीचा विशेष आकर्षणाचा भाग असतो तो साडीचा पदर. सोन्या-चांदीच्या जरी बरोबरच या पदरावरती मंदिरावरील नक्षीकाम सुंदर पद्धतीने तयार केले जाते.
- या साड्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या उत्पादनात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
- एक साडी हातमागावरती विणण्यासाठी 10-12 दिवस लागतात.
धर्मावरम साडी विणण्याची पद्धत
- इंटरलॉक्ड-वेफ्ट तंत्र नावाच्या विशेष तंत्राचा वापर करून धर्मावरम साड्या विणल्या जातात, ज्यामुळे त्यांना एक विशिष्ट पोत आणि डिझाइन मिळते. विणकामाची प्रक्रिया पिट लूम्सवर केली जाते, साडीच्या विणकामासाठी उच्च कौशल्य आणि अचूकता आवश्यक असते.
- पिट आणि फ्रेम लूमवर या साड्या विणण्यासाठी दोन जॅकवर्ड वापरतात. एका जॅकवर्ड वर बॉडी आणि पल्लू चे डिझाइन विणल्या जातात, तर दुसऱ्यावर बॉर्डर विणली जाते.
- गोल्ड-टेस्टेड जरी, ज्याला स्थानिक भाषेत हाफ-फाईन जरी म्हणूनही ओळखले जाते, अधीक ताना आणि अधीक वेफ्ट डिझाइनिंगसाठी मलबेरी फिलेचर रेशमी धाग्यांसह ताना आणि वेफ्ट सिल्कमध्ये वापरले जाते. पुरीजरी हे अधूनमधून डिझाइनमध्ये वापरले जाते.
- या साड्या 26 वेगवेगळ्या डिझाइन्स मध्ये तयार केल्या जातात. 11 डिझाईन्स या हातमागावरती तयार केल्या जातात. आणि 15 डिझाईन्स या पॉवरलूम वरती तयार केल्या जातात.
- आधुनिक पद्धतीने या साड्यांवरील डिझाईन्स संगणकावर लोड करून मग कार्डवर पंच करतात. आणि सर्वात शेवटी जॅकवर्ड लूमवर सेट केल्या जातात.
प्युअर धर्मावरम साडी कशी ओळखायची ?
- सोन्याच्या आणि चांदीच्या जरीच्या वापरामुळे या साड्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे जर आपल्याला कमी किंमतीत जर ही साडी उपलब्ध होत असेल तर ती नक्कीच प्युअर साडी नाही हे लक्षात घ्यावे.
- या साड्यांना भौगोलिक स्थानदर्शकता प्राप्त आहे. त्यामुळे GI टॅग बघूनच साडी खरेदी करावी.
- या साड्यांवरील सिल्क मार्क चेक करा, हा मार्क फक्त अस्सल विक्रेत्यांकडेच असतो.
- साड्या दोन शेड्स मध्ये तयार केल्या जातात. हे या साडीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
- या साडीचा एक धागा जाळून बघा. जर याचा वास जळालेल्या केसांसारखा आला तर ती प्युअर रेशीम साडी आहे हे लक्षात घ्यावे.
- शक्यतो आपली फसवणूक न होण्यासाठी या साड्या ओळखीच्या ठिकाणी किंवा कारागीरांकडेच खरेदी कराव्या.
धर्मावरम सिल्क साडीची काळजी कशी घ्यायची ?
- या साड्यांना ड्रायक्लीनच करावे. त्यामुळे साडी वरील सोन्याची-चांदीची जर खराब होत नाही.
- साडी घरी धुणे टाळा कारण त्यामुळे साडी खराब होऊ शकते.
- या साड्या आद्रते पासून लांब कोरड्या ठिकाणी सावलीमध्ये ठेवाव्यात.
- प्लास्टिक मध्ये या साड्या ठेवू नये.
- अधून मधून साड्यांची घडी बदलावी त्यामुळे साडीची जर खराब होत नाही.
- वर्षातून 1 ते 2 वेळेस हलके ऊन दाखवावे, ज्यामुळे साडीतील थोडाफार ओलावा नाहीसा होईल.
- या साड्यांवरती डायरेक्ट परफ्युमचा वापर करू नये, ते साडी खराब करू शकते.
- या साडीला अगदी हलकी इस्त्री करावी.
या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या धर्मावरम साडीची काळजी घेऊ शकता आणि पुढील अनेक वर्षे ती टिकू शकते.
धर्मावरम साडीची किंमत किती असते?
- अस्सल धर्मावरम साडीची किंमत रेशमाची गुणवत्ता, साडीवरील डिझाईन यासारख्या विविध घटकांवर अवलंबून बदलू शकते.
- या साड्यांवरील विणकाम आणि फॅब्रिकची गुणवत्ता यानुसार या साड्यांची किंमत कमी किंवा जास्त होऊ शकते
- धर्मावरम सिल्क साडीची कमीत कमी किंमत ही 5000 पासून सुरू होते.
- धर्मावरम सिल्क साड्यांवर जितके जास्त विणकाम केले जाते तितकीच या साड्यांची किंमत वाढते.
- या साड्यांची जास्तीत जास्त किंमत 1 लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते.
धर्मावरम साडीतील प्रसिद्ध कलर कोणते ?
पूर्वी या साड्या फक्त निवडक पारंपरिक रंगांमध्येच तयार केल्या जात असे परंतु ग्राहकांच्या वाढत्या मागणीनुसार या साड्या आता वेगवेगळ्या रंगात देखील उपलब्ध आहेत.
लाला, हिरवा, रॉयल ब्लू, पिवळा, नारंगी आणि निळा हे सर्वसाधारण कलर असतात.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment