महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अध्यात्मिक दृष्टया एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो. एका वर्षामध्ये १२ शिवरात्री असतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यामध्ये एक शिवरात्री येते. परंतु फाल्गुन महिन्यातील म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी – मार्च मध्ये येणार्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक महत्व असते.महाशिवरात्रीच्या रात्री चंद्र आणि सूर्य विशेष योगामध्ये असतात. या दिवशी साधना आणि ध्यान केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होते. मान्यतेनुसार, या रात्री भगवान शिव स्वतः भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
महाशिवरात्रीचा इतिहास आणि प्रमुख कथा
१. समुद्र मंथन आणि कालकूट विष – देव आणि असुरांमध्ये झालेल्या समुद्र मंथनाच्या वेळी अनेक अमूल्य रत्नांसह एक अत्यंत विषारी विष निघाले. हे विष इतके भयानक होते कि संपूर्ण सृष्टीला नष्ट करू शकत होते. त्या वेळी भगवान शिवाने हे विष आपल्या कंठात (गळा ) धारण केले, त्यामुळे त्यांना ‘नीलकंठ’ असेही म्हटले जाते. तो दिवस महाशिवरात्रीचा दिवस म्हणून साजरा करतात.
२. शिव-पार्वती विवाह – महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह झाला. या कारणामुळे हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि भक्तगण भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती करतात.
३. शिकारी आणि बेलपत्र कथा – एका शिकाऱ्याने एका बेलाच्या झाडावर बसून आपल्या शिकारसाठी वाट पाहत असताना तो झाडावरील बेलपत्रे खाली टाकत होता. त्या झाडाखाली एक शिवलिंग होते आणि ते सर्व बेलपत्र शिवलिंगावरती पडत होते आणि शिकार न मिळाल्यामुळे त्याला रात्रभर उपवास घडला. अनवधानाने तो भगवान शिवाची पूजा करत होता. त्यामुळे त्याला मोक्ष प्राप्त झाला.
महाशिवरात्रीचे महत्त्व
महाशिवरात्री हा दिवस भक्तांसाठी अत्यंत मोठी पर्वणीच असते. या दिवशी भगवान महादेवाची उपासना करून उपवास ठेवण्याची प्रथा आहे. तसेच अनेक ठिकाणी रात्रभर जागरण, भजन आणि शिवपुराणाचे पठण केले जाते. या दिवशी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र आणि भस्म अर्पण करून भक्तगण आपल्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी प्रार्थना करतात.
महाशिवरात्रीच्या रात्री चंद्र आणि सूर्य विशेष योगामध्ये असतात. या दिवशी साधना आणि ध्यान केल्याने अत्यंत शुभ फळ प्राप्त होते. मान्यतेनुसार, या रात्री भगवान शिव स्वतः भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
महाशिवरात्री पूजाविधी
१. सकाळी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे.
- शिवलिंगावर जल, दूध, मध, दही आणि तूप अर्पण करणे.
- बेलपत्र, धतूरा (धोत्रा) आणि आकडा ची (रुई ) फुले अर्पण करावी.
- स्तोत्र, मंत्र, जप, शिवतांडव स्तोत्र पठाण करावे.
- रात्रभर जागरण आणि महादेवाचे भजन-कीर्तन करावे.
- महादेवाच्या कृपेसाठी उपवास ठेऊन दुसऱ्या दिवशी पारणे करावे.
महाशिवरात्री हा फक्त एक धार्मिक सण नाही, तर तो आत्मशुद्धी आणि भक्तीचा दिवस आहे. या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि त्यांचे कष्ट कमी होतात. त्यामुळे, भक्तगण हा पवित्र दिवस अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा करतात. आणि आपले भोळे महादेव भक्ताची भक्ती बघून अतिशय प्रसन्न होतात.
Leave a comment