बनारस मधील फेमस असलेली बनारसी साडी चे प्रकार, डिझाइन आणि इतिहासाबद्दल महिलांना संपूर्ण माहित असणे गरजेचे आहे. अस्सल बनारसी साडी विकत घेण्यापूर्वी या लेखामधील काही महत्वाच्या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील.
बनारसी साडी ही बारीक विणलेल्या अति तलम रेशमा पासुन बनवल्या जातात, आणि त्यावरती जरीचा वापर करून सुंदर असे मनमोहक नक्षीकाम केले जाते. वाराणसी हे शहर गुलाबी मिनाकरीसाठी देखील ओळखले जाते.
उत्तर प्रदेशातील वारानसी या शहराला बनारस असे ही म्हणतात किंवा काशी असे ही म्हणतात. भारतामध्ये काशी हे स्थान धार्मिकदृष्टीने फार महत्वाचे आहे. त्याच बरोबर हे स्थान भारतातील सर्वात मौल्यवान हातमागंवरती बनवलेल्या साडी साठी प्रसिद्ध आहे.
या साड्या हातमागावरती बनवल्या जातात. कारागीर स्वतःच्या हाताने या साड्यांवरती अतिशय सुंदर असे रेशीम आणि जरीचे विणकाम करतात. उत्तर प्रदेशातील विणकर संघटनांनी 2009 मध्ये “वाराणस ब्रॉकेड आणि साड्या” यासाठी भौगोलिक संकेत (GI) हक्क मिळवले आहेत. चला तर बघुया बनारसी सिल्क साडी बद्दल संपूर्ण माहिती.
बनारसी सिल्क साडीचा इतिहास | History of Banarasi Silk Saree.
बनारसी साडी ही भारतामधील उत्तर प्रदेश राज्यामधील वाराणसी या शहरामध्ये बनवली जाते. या साडीला बनारसी साडी किंवा वाराणसी साडी असे ही म्हणतात, त्याचबरोबर या साडीचा इतिहास (History) खूप प्राचीन आहे. वाराणसी हे अति प्राचीन शहर आहे, हे शहर बनारसी साडी बरोबरच तेथील मंदिरांसाठी ही अतिशय प्रसिद्ध आहे. कापूस वस्त्र उद्योगाचे एक भरभराटीचे क्षेत्र म्हणून शफल फीच (1583-91) यांनी बनारसचा उल्लेख केला आहे.
चौदाव्या शतकाच्या आसपास मुघल काळात ही कला विकसित झाली. या साडीवरती मुघल प्रेरित रचनांचा वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ गुंफलेल्या फुलांचे आणि पानांचे नक्षीकाम, कलगा आणि वेल. बाहेरच्या बाजूला झालर नावाची सरळ पानांची एक तारी या पद्धतीने या साडीवरील विणकाम असते.
गुजरात मधील 1603 दुष्काळामध्ये तेथील रेशीम विणकर बनारस मध्ये स्थलांतरीत झाले. त्यानंतर 17 व्या शतकात रेशीम ब्रॉकेड विणकाम सुरू झाले. 18 व्या आणि 19 व्या शतकामध्ये उत्कृष्टपणे या साडी चे विणकाम विकसित झाले.
बनारसी साडी चे वैशिष्ट्ये | Features of Banarasi saree
- बनारसी सिल्क साड्या सोने-चांदीच्या, ब्रोकेड किंवा जरी, उत्कृष्ट प्रकारचे रेशीम आणि त्यावरील केलेल्या भरत कामासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
- या साड्या अस्सल रेशमापासून बनवल्या जातात आणि त्यावरील जरीच्या विणकामामुळे या साड्या अतिशय महाग असतात.
- बनारस मधील विणकर या साड्या बनवण्यासाठी पारंपारिक यंत्रांचा वापर करतात.
- ही साडी हात मागावरती बनवण्यासाठी 15 दिवस ते 1 महिना लागतो.
- जर साडीवरील नक्षीकाम, कलाकुसर अधिक असेल तर त्याप्रमाणे साडी बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो, काही साड्या बनविण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष इतका कालावधी देखील लागतो.
- बनारसी सिल्क साडीला लग्न समारंभ आणि पूजेसाठी विशेष महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर लग्नासाठी नववधूदेखील या साडीला विशेष पसंती देते.
- या साडीवरील नक्षीकाम आणि जरीच्या वापरामुळे या साडी ला वजन असते.
- या साडीवरील इतर वैशिष्ट्य म्हणजेच त्यावरील सोन्याचे काम, कॉम्पॅक्ट विणकाम, लहान तपशीलांसह आकृत्या, धातूचे दृश्य प्रभाव, जल आणि मीना वर्क.
- या साडी उद्योगाला योग्य प्लॅटफॉर्म देण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या ब्रँड्स उदयास आले आहेत, ज्यामध्ये HKV बनारस (HKVBenaras), एकाया (Ekaya), टिलफी (tilfi) बनारस यांचा समावेश आहे.
- रेशीम डाय करण्यासाठी रासायनिक रंगाचा वापर केला जातो त्यामुळे गंगा नदीचे पाणी प्रदूषित होते, म्हणून नैसर्गिक कलर तयार करणे आणि त्याचा वापर या वरती भर दिला जात आहे.
- IIT – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आणि BHU- बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या संशोधन पथकाने नैसर्गिक रंग विकसित केलेले आहेत. हे रंग फुले आणि फळांपासून तयार केले जातात, ज्यामुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.
बनारसी सिल्क साडी चे प्रकार आणि त्यावरील डिझाइन | Types of Pure Banarasi Silk Sarees
- कतन बनारसी साडी | Katan Banarasi Sarees : कतन हे साधे रेशमाचे धागे आहे, या धाग्यांमध्ये शुद्ध रेशमाचे धागे वळवले जातात. त्यानंतर हे धागे सिल्कच्या साड्यांमध्ये विणले जातात. पूर्वी कतन या साड्या हात मागावरती बनविल्या जात असे, परंतु बदलत्या काळानुसार आणि वाढत्या मागणीनुसार या साड्या आता लूम वरती बनवल्या जातात, या साडीचा कपडा अगदी मऊ आणि बारीक असतो.
- शत्तीर बनारसी साडी | Shattir Banarasi Sarees : आधुनिक पद्धतीच्या साड्यांसाठी शत्तीर एक उत्तम फॅब्रिक आहे. बनारसी नावाने वेगवेगळ्या नक्षीकाम तयार करण्यासाठी हे फॅब्रिक अतिशय उत्तम आहे.
- जॉर्जेट बनारसी साडी | Georgette Banarasi Sarees : हे फॅब्रिक क्रेप यार्न पासून बनवलेले आहे. जॉर्जेट हे बारीक विणलेले अगदी हलके फॅब्रिक आहे. हे फॅब्रिक हलके आणि दिसायला सुंदर असल्यामुळे आधुनिक प्रकारच्या साड्यांमध्ये जास्त लोकप्रिय आहे.
- जाल किंवा जंगला बनारसी साडी | Jangla Banarasi Sarees : याच्या नावावरूनच लक्षात येते की या प्रकारामध्ये जाळीदार विणकाम केले जाते. या मध्ये फुले, पाने, मानवी चित्रे, पक्षी, प्राणी इत्यादींचे विणकाम केले जाते यामध्ये बुट्टी तयार करून त्याच्या आजूबाजूला एका विशिष्ट पॅटर्न मध्ये हे सर्व डिझानचे पॅटर्न तयार केले जातात.
- तनचोई बनारसी साडी | Tanchoi Banarasi Sarees : तनचोई हा एक प्रकार लग्नसमारंभासाठी अतिशय लोकप्रिय आहे. ही साडी जमावर शैलीतील पेस्ले (Paisley) किंवा जरीने विणलेली आहे. यासाडीचा पल्लू पेस्लेच्या छान विणकामाने सजवलेला असतो, बनारसचे कारागीर ही साडी रंगीबेरंगी रेशमाच्या धाग्यांपासून तयार करतात. या साडीच्या बॉर्डरवरती क्रिस-क्रॉस प्रकारचे नक्षीकाम केले जाते.
- कटवर्क बनारसी साडी | Cutwork Banarasi Sarees : ही साडी फार महाग नसुन ती कटवर्क पद्धतीने बनवली जाते. रेशमाच्या धाग्यांमध्ये कॉटनचे धागे एकत्र करून ही साडी बनवली जाते. या प्रकारच्या साड्यांचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे चमेली, झेंडूचे फुले, वेल, पाने या नक्षीकामामुळे ही साडी अतिशय लोकप्रिय आहे.
- टिशू बनारसी साडी | Tissu Banarasi Sarees : टिशू साड्या म्हणजे जरी आणि सिल्कचे एकत्रीकरण करून तयार केली आहे. सोनेरी जरी या साडी मध्ये इतक्या नाजूकपणे विणली जाते की त्यामुळे साडीला एक छान चमक येते. या साडीची बॉर्डर आणि पल्लू पेस्लेसह विणलेला आहे. यामध्ये सर्वात लोकप्रिय नक्षीकाम म्हणजे सोनेरी जरीने विणलेले कमळ जे तेजस्वी तलावामध्ये तरंगते आहे. आणि पाण्याचा थेंब कटवर्क तंत्राने तयार केलेले आहेत.
- बुट्टीदार बनारसी साडी | Buttidar Banarasi Sarees : या प्रकारामध्ये साडी वरती सोने, चांदी आणि रेशमाच्या धाग्यांनी बुट्टी तयार केली जाते. बुट्टी असलेल्या साड्या शक्यतो सर्वात जास्त लोकप्रिय असतात. शक्यतो चांदीच्या जरी पेक्षा सोन्याच्या जरी मधील बुट्टी ही सावलीमध्ये अगदी गडद छान दिसते त्यामुळे बनारस चे विणकर ब्रॉकेटच्या या प्रकाराला गंगा- जमुना असे म्हणतात. यामध्ये पत्ती बुट्टी, रेशीम बुट्टी, जरी बुट्टी, अंगूर वेल, अश्रफी बुट्टी, लतिका बुट्टी, बलुचर बुट्टी हे सर्व प्रकार लोकप्रिय आहेत.
- जामदनी बनारसी साडी | Jamdani Banarasi Sarees : जामदनी साडीला ढाकाई साडी म्हणून सुद्धा ओळखतात. सुती आणि क्वचित जरीच्या धाग्यांनी रेशमाची एक विशिष्ट साडी आहे. साडी मध्ये हाताने सुंदर फुलांची आकृती तयार केली जाते, यामध्ये पाने, झेंडू, चमेली इत्यादी डिझाइन असतात.
हे सुद्धा वाचा :- बनारसी साडी चे सगळ्यात जास्त वापरले जाणारे १० कलर नक्की पहा
Banarasi Saree Motif Work Type With Name
- वेल | Bel : यामध्ये संपूर्ण साडी वरती वेलीचे, फुले आणि पाने यांचे विणकाम केले जाते. कधी कधी या वेलींमध्ये बुट्टी देखील विणली जाते त्यामुळे साडी मध्ये पट्टी सारखे नक्षीकाम तयार होते. फुले, प्राणी, पक्षी आणि मानवी यांचे नक्षीकाम देखील तयार केली जातात.
- झालर | Jhalar : झालरच्या नमुन्या मध्ये पोपट, मोर, कैरी, वेल, तीन पाने, पाच पाने या प्रकारचे विणकाम केले जाते. साडीच्या बॉर्डर नंतर ज्या नक्षीकामाला सुरुवात होते त्याला झालर असे म्हणतात. शक्यतो याचा रंग बॉर्डरशी मिळता जुळता असतो.
- कोणीया | Koniya : ही एक पारंपरिक कला आहे. याचा आकार आंब्या सारखा ( कुयरी ) असतो. याचे तीन प्रकारच्या जाळ्यांपासून विणकाम केले जाते. यामध्ये विशिष्ट प्रकारे पदराच्या एका कोपऱ्यामध्ये नक्षीकाम केले जाते. त्या प्रकाराला कोणीया असे म्हणतात. ज्या कापडांमध्ये सोन्याचे किंवा चांदीचे धागे वापरले जातात त्यामध्येच कोणीया तयार केला जातो. कोणीया तयार करण्यासाठी रेशीमच्या धाग्यांचा वापर करत नाहीत, कारण रेशमाच्या धाग्यांमध्ये फुलांचे आणि पानांचे नक्षीकाम उठवदार दिसत नाही.
- बुट्टा | Butta : या वरती बुट्टीचे विणकाम हे मोठ्या आकाराचे बनवले जाते त्याला बुट्टा असे म्हणतात. यामध्ये फुल, फळे, किंवा झाडे, झुडपे ही असू शकतात. या सर्वांच्या वापरामधून बुट्ट्यांचे नक्षीकाम आकर्षशीत बनवले जाते. गोल्डन, सिल्वर किंवा रेशीम धागे यांच्या मिश्रणातून बुट्टा तयार केला जातो.
- बुट्टी | Butti : साडी वरती छोटे छोटे विणकाम केले जाते त्याला बुट्टी असे म्हणतात. ही बुट्टी सोनेरी किंवा चंदेरी जरी मध्ये असतात. किंवा रेशमाच्या धाग्यांमध्ये ही तयार करतात.
- शिकारगड | Shikargadh : Shikargadh प्रकारामध्ये आपण साडी वरती शिकारीचे दृश्य, प्राणी, पक्षी, पाने, वेल इत्यादींचे नक्षी काम आपण बघु शकतो.
शुद्ध बनारसी साडी कशी ओळखायची | How to Identify Pure Banarasi Saree
- प्युअर बनारसी साडी ची अस्सलता जर तपासायची असेल, तर ही साडी नेहमी उलट्या बाजूने चेक करावी. हात मागावरती बनवलेल्या साड्या नेहमी ताना आणि वेफ्ट ग्रिडमध्ये फ्लोट असतात. तसेच ज्या साड्या मशीन मध्ये बनवल्या जातात त्या साड्यांना अगदी मऊ फिनिशिंग असते.
- प्युअर बनारसी साडीवर सिल्क मार्क असेल, जे दर्शवते की ती शुद्ध सिल्क पासून बनलेली आहे. त्यामुळे सर्वात आधी साडीवरील प्युअर सिल्क मार्क चेक करा. हे सिल्क मार्क फक्त प्युअर सिल्क साडी बनवणाऱ्यांकडेच असतात.
- बनारसी साड्या त्यांच्या किचकट जरी कामासाठी ओळखल्या जातात. साडीच्या डिझाइनमध्ये बारीक आणि तपशीलवार विणकाम पहा. जरीचे काम सामान्यतः शुद्ध सोने किंवा चांदीच्या धाग्यांपासून बनवले जाते.
- बनारसी साड्या जड असतात कारण त्या प्युअर सिल्क आणि जरी वर्कच्या असतात. शुद्ध बनारसी साडीचे वजन सुमारे 1-1.5 किलो असू शकते.
- शुद्ध बनारसी साडी रेशमाच्या दर्जामुळे आणि जरीच्या किचकट कामामुळे महाग असते. जर आपल्याला कमी किंमतीत बनारसी साडी भेटत असेल तर ती नक्कीच प्युअर बनारसी साडी नाही हे समजून घ्यावे.
- बनारसी साड्या वेगवेगळ्या विणकामात बनवल्या जातात जसे की कटान, ऑर्गेन्झा आणि जॉर्जेट.
- बनारसी साड्या त्यांच्या पारंपारिक डिझाईन्ससाठी ओळखल्या जातात जसे की पेस्ले, फुलांचा आकृतिबंध आणि मुघल कलेने प्रेरित असलेले अवघड नक्षीकाम. जर साडीमध्ये आधुनिक डिझाइन्स किंवा प्रिंट्स असतील तर ती शुद्ध बनारसी साडी असू शकत नाही.
हे मुद्दे लक्षात ठेवून, तुम्ही शुद्ध बनारसी साडी ओळखू शकता.
बनारसी साडी ची काळजी कशी घ्यायची? | How to take care of Banarasi saree?
बनारसी साड्यांची काळजी घेण्यासाठी या काही टिप्स:
- नाजूक रेशीम धाग्यांना हानी पोहोचू नये म्हणून बनारसी साड्या नेहमी ड्राय क्लीन केल्या पाहिजेत. त्यांना घरी धुण्याचा प्रयत्न करू नका.
- साडी वापरात नसताना, तुमची बनारसी साडी थेट सूर्यप्रकाशापासून दूर थंड, कोरड्या जागी ठेवा. साडी लटकवू नका कारण यामुळे फॅब्रिक ताणू शकते.
- बनारसी साडी नेसताना ती धारदार वस्तू किंवा दागिन्यांवर अडकणार नाही याची काळजी घ्या. तीक्ष्ण किंवा टोकदार दागिने घालणे टाळा ज्यामुळे साडी खराब होऊ शकते.
- जर तुमची बनारसी साडीवर सुरकुत्या पडल्या असेल तर ती कमी उष्णतेवर इस्त्री करा. उच्च उष्णतेवर इस्त्री करणे टाळा कारण यामुळे रेशीम तंतू खराब होऊ शकतात.
- तुमच्या बनारसी साडीवर डाग पडल्यास, शक्य तितक्या लवकर एखाद्या व्यावसायिक ड्राय क्लीनरकडे न्या. घरात डाग काढण्याचा प्रयत्न करू नका कारण यामुळे आणखी नुकसान होऊ शकते.
या टिप्सचे अनुसरण करून, तुमची बनारसी साडी पुढील अनेक वर्षांसाठी उत्कृष्ट स्थितीत राहील.
इतर उत्पादने | Other Products : बनारसी दुपट्टा, बनारसी लेहेंगा, शेरवानी, पर्स, क्लच, इत्यादी.
हे सुद्धा वाचा :-
Leave a comment