सरकारी योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) संपूर्ण माहिती – 2025 | pradhan mantri pik vima yojana | Fasal Bima Yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली एक अतिशय महत्त्वाची योजना आहे. जी शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, रोग, कीड, अतिवृष्टी किंवा दुष्काळामुळे आणि बाजारातील चढ-उतार यामुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देते. या योजनेमुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत प्राप्त होते. या लेखात आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पीक विमा योजना म्हणजे काय?

नैसर्गिक आपत्त्या, अनपेक्षित हवामान बदल आणि पिकांवरील रोग, यामुळे भारतीय शेती आणि शेतकऱ्याला नेहमीच संकटाना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत शेतकऱ्याचे उत्पन्न सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच उद्दिष्टाने भारत सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) सुरू केली. ही योजना केवळ आर्थिक मदतच नाही, तर शेतकऱ्यांना भविष्याबद्दल आश्वस्त करणारी एक सुरक्षितता कवच आहे.

योजनेचे मुख्य उद्दिष्टे:

  • नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण- पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, किडींचा प्रादुर्भाव, रोगराई अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण या योजने अंतर्गत दिले जाते.
  • आर्थिक स्थैर्य- नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं नुकसान झाल्यास त्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य टिकवून ठेवणे.
  • आधुनिक शेतीला प्रोत्साहन- शेतकऱ्यांना आधुनिक आणि सुधारित शेती पद्धती आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित देणे.
  • पतपुरवठ्यात सातत्य- कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठा अखंडित ठेवणे, ज्यामुळे अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषी क्षेत्राचा विकास साधला जाईल.

योजनेची वैशिष्ट्ये:

  • ऐच्छिक सहभाग- ही योजना कर्जदार आणि बिगर-कर्जदार दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. म्हणजेच, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी विमा काढणे बंधनकारक नाही, शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार विमा काढू शकतात.
  • सर्वसमावेशक पीक संरक्षण- पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण मिळते. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती (उदा. पूर, गारपीट), काढणीपश्चात नुकसान (चक्रीवादळ, अवकाळी पाऊस) यांचा समावेश होतो.
  • तात्काळ मदत- उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांच्या नुकसानीचे आकलन तात्काळ केले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांना दावा रक्कम लवकर मिळू शकते.
  • जोखीमस्तर- सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७०% निश्चित करण्यात आला आहे.
  • माफक विमा हप्ता- शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २% आणि रब्बी हंगामासाठी १.५% असतो. उर्वरित विमा हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून दिला जातो. महाराष्ट्र शासनाने आता ‘१ रुपया पीक विमा योजना’ सुरू केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याला केवळ १ रुपया भरून पीक विमा घेता येतो.

महत्वाची नोंद –

कुळाने/भाडेपट्टीने शेती करणाऱ्यांसाठीही लाभ: खातेदारांव्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. मात्र, त्यांना नोंदणीकृत (Registered) भाडेकरार पीक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.

पीक विमा योजनेच्या अंतर्गत विमा संरक्षण कोणत्या बाबींवर मिळते?

  • पीक पेरणीपासून काढणीपर्यंत- नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला विमा संरक्षण मिळते. या प्रक्रियेमध्ये पिकाचे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घट विचारात घेऊन शेतकऱ्याला पिकाची नुकसान भरपाई दिली जाते.
  • स्थानिक आपत्ती- शेतात पाणी साठणे, पूर, गारपीट, भूस्खलन अशा स्थानिक संकटांसाठी वैयक्तिक स्तरावर सर्वेक्षण करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाते.
  • काढणीपश्चात नुकसान- पीक काढल्यानंतर १४ दिवसांपर्यंत जर ते शेतात ‘कापलेल्या व विखुरलेल्या’ स्थितीत सुकवण्यासाठी ठेवलेले असेल आणि या काळात चक्रीवादळ, वादळी पाऊस, अवकाळी पाऊस यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यास विमा संरक्षण मिळते.

अर्ज कसा करावा?

खालीलपैकी कोणत्याही पद्धतीने शेतकरी पीक विम्यासाठी अर्ज करू शकतात:

  • बँक/वित्तीय संस्था- ज्या बँकेतून पीक कर्ज घेतले आहे, त्या बँकेमार्फत अर्ज करता येतो.
  • सामान्य सुविधा केंद्र (CSC)- आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अर्ज भरता येतो. येथे प्रति शेतकरी ४० रुपये शुल्क केंद्र सरकारने निश्चित केले आहे.
  • आपले सरकार सेवा केंद्र- या केंद्रांवरूनही शेतकऱ्यास अर्ज भरता येऊ शकतो.
  • ऑनलाइन पोर्टल- https://pmfby.gov.in या पोर्टलवर किंवा कृषी विभागाच्या https://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करता येतो.

आवश्यक कागदपत्रे

  • ७/१२ उतारा
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड
  • पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र (Self-declaration)
  • ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक (Agristack Registration Number)
  • ई-पीक पाहणी (E-Pik Pahani)
  • (जर भाडेपट्टीने शेती करत असाल तर) नोंदणीकृत भाडेकरार

नुकसान भरपाईसाठी काय करावे?

  • पीक नुकसानीची घटना घडल्यास, शेतकऱ्यांनी ४८ तासांच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री नंबरवर (उदा. १४४४७) द्यावी.
  • या सूचनेत घटना घडल्याची तारीख, वेळ, नुकसानीची कारणे, प्रकार, प्रमाण आणि सर्व्हे नंबर यांचा समावेश असावा.
  • विमा कंपनी, कृषी अधिकारी आणि तलाठी संयुक्त पाहणी करतील.
  • पाहणी अहवालानुसार भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली जाते.

महाराष्ट्रातील सद्यस्थिती

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम २०१६ पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २०२४-२५ पर्यंत १ रुपया प्रति अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात आली आहे. आता खरीप हंगाम २०२५ पासून सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना (‘Cup & Cap Model (८०:११०) नुसार’) उत्पादनावर आधारित पद्धतीने राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

महत्वाचे-

  • पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ही प्रत्येक हंगामासाठी वेगवेगळी असते, ती कृषी विभागाच्या अधिसूचनेनुसार तपासावी. उदाहरणार्थ, खरीप २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.
  • अधिक माहितीसाठी केंद्र शासनाच्या १४४४७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

या योजनेमुळे नैसर्गिक आपत्तींच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होते आणि त्यांना शेतीत टिकून राहण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

योजनेचे फायदे

  • कमी प्रीमियममध्ये जास्त संरक्षण
  • सर्व नैसर्गिक आपत्त्यांपासून बचाव
  • थेट बँक खात्यात भरपाई जमा
  • केंद्र सरकारची हमी
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी सुविधा

शेतकऱ्यांनी लक्षात ठेवाव्या अशा गोष्टी:

  • पेरणीची नोंद वेळेत करणे गरजेचे आहे.
  • नुकसान झाल्यास त्वरित कळवणे आवश्यक.
  • विमा भरताना पावती अवश्य घ्या.
  • नोंदणी करताना पिकांची माहिती अचूक भरा.

हे सुद्धा वाचा-

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
सरकारी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी...

Sukanya Samriddhi Yojana
सरकारी योजना

सुकन्या समृद्धी योजना ( SSY योजना )– मुलींच्या भविष्याची सुरक्षित शिदोरी

भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही...

Ladki bahin yojana band honar ka
सरकारी योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: “लाडकी बहीण योजना बंद होऊ शकते का?”

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत....